महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ मार्च । राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढचे काही दिवस मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. ५ ते ८ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊसा होऊ शकतो. हवामान खात्याच्या अंजानुसार काल बुलढाण्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. तसेच अन्य ठिकाणी देखील पावसाने हजेरी लावली आहे. (Latest Weather Report)
नाशिकांत गारपीट
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. काल रात्रीपासून अनेक भागात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर तालुक्यासह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट देखील झाली आहे. द्राक्षांसह अन्य पिकांना मोठा फटका बसण्याची भीती असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत.
पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात काही भागात पावसाची रिपरिप झाली. तर पालघर तालुक्यातील सफाळेत सोमवारी पहाटे विजेचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळलाय. तासभरत मजबूत पाऊस कोसळत वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. यामध्ये शेतकरी, विट उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सफाळे परिसरात सोमवारी पहाटे साडेतीन वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्याच दरम्यान शेतकऱ्यांचा सफाळे बाजारपेठेत भाजी विक्रेत्यांचा बाजार भरला होता. मुसळदार पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. या वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिके, आंब्याला आलेली छोटी फळे पूर्णपणे गळून पडली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.परिसरात काही ठिकाणी नवीन घर व दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र पावसामुळे एकच तारांबळ उडाली असून पहाटेच्या सुमारास उघड्या घरांना प्लॅस्टिकच्या आधार घ्यावा लागला. विट उत्पादक,शेतकरी, बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात रात्री जवळपास सर्वच तालुक्यात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बरसला या अवकाळी पावसामुळे मात्र गहू हरभरा व कांदा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा चिंतातूर झालेला आहे.
अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलीये. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी गाराही पडल्या तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. या अवकाळी पावसाने शेती पिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आज सकाळी देखील जिल्ह्यात ढगाळ वातावरण बघायला मिळतंय.