महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ मार्च । देशात वाघांची संख्या वेगाने वाढत असली तरी त्यांच्या मृत्यूंची संख्याही धक्कादायक आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात 1 हजार 59 वाघांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा पाहून सर्वोच्च न्यायालयही हळहळले आहे. वाघांच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारला धारेवर धरले असून तीन महिन्यांत उत्तर द्या असे आदेश दिले आहेत.
2017 मध्ये अनुपम त्रिपाठी यांनी वाघांच्या मृत्यूबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वाघांच्या मृत्यूबाबत माहिती सादर करा असे खंडपीठाने केंद्राला सांगितले. देशामध्ये सध्याच्या घडीला तीन हजार वाघ आहेत. मात्र गेल्या दहा वर्षांत एक हजारांपेक्षा जास्त वाघांचा मृत्यू होणे हे धक्कादायक आहे. देशात मध्य प्रदेशात सर्वाधिक वाघ आहेत पण तिथे वाघांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही सर्वाधिक आहे याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. जानेवारीत मागील सुनावणीवेळी केंद्र सरकारने 2018 च्या जनगणेनुसार देशातील 53 संरक्षित क्षेत्रांमध्ये 2967 वाघ असल्याची माहिती दिली होती.
महाराष्ट्रात वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातच मृत्यू वाढले
महाराष्ट्रात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिह्यातच वाघांच्या मृत्यूंच्या घटना वाढल्या आहेत. चंद्रपुरात 203 वाघ आहेत. त्यातील पाच वाघ नवेगाव-नागझिराच्या जंगलात तर 25 वाघ सह्याद्री, मेळघाट आणि संभाजीनगर येथे स्थलांतरित केले जाणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. वाघांना राहण्यासाठी क्षेत्र कमी पडू लागल्याने त्यांच्या झुंजी होतात आणि त्यात वाघांचा मृत्यू होतो, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.