एअर इंडियाच्या केबिन क्रूला अधिकाऱ्यांनी रोखलं; शर्टच्या बाह्या वर करायला लावल्या अन् मग…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ मार्च । एअर इंडियाच्या एका केबिन क्रूला सोन्याची तस्करी करताना अटक झाली आहे. बुधवारी कोच्ची विमानतळावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक करण्यात आली. आरोपी कर्मचारी केरळच्या वायनाडचा रहिवासी आहे. शफी असं त्याचं नाव आहे. सीमा शुल्क अधिकाऱ्यांना त्याच्याकडे १ किलो ४८७ ग्रॅम सोनं सापडलं. बहारीन-कोझिकोड-कोच्ची विमानतळावर कर्तव्य बजावत असलेल्या शफीकडे सोनं सापडलं आहे.

सोन्याच्या तस्करीसाठी शफीनं वेगळाच मार्ग शोधला. त्यानं हाताला सोनं चिकटवलं. पूर्ण बाह्यांचं शर्ट घातल्यानं त्याला सोनं लपवता आलं. शर्टखाली सोनं लपवून त्यानं ग्रीन चॅनलमधून पुढे जाण्याची योजना आखली. मात्र सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी त्याला पकडलं. त्याची झडती घेतली. त्याला शर्टच्या बाह्या वर करण्यास सांगितलं. त्यावेळी अधिकाऱ्यांना त्याच्या हातांवर सोन्याचा लेप दिसून आला. सध्या शफीची चौकशी सुरू आहे. एएनआय वृत्तसंस्थेनं शफीचा फोटो शेअर केला आहे. त्यात शफीच्या हातावर सोन्याचा लेप दिसत आहे.

 

रात्री साडे आठ वाजता एअर इंडियाचं विमान बहरीनहून कोच्चीला पोहोचलं. याच विमानात शफी होता. त्याला रात्री १० वाजून २० मिनिटांनी पकडण्यात आलं. यानंतर त्याला सीमा शुल्क निवारण विभागाच्या कार्यालयात नेण्यात आलं. याआधी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३.३२ कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या काड्या जप्त करण्यात आल्या. यासंदर्भात श्रीलंकेच्या एका नागरिकासह दोन प्रवाशांना अटक करण्यात आली. याशिवाय गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी सिंगापूरहून चेन्नईला पोहोचलेल्या दोन प्रवाशांना रोखण्यात आलं. त्यांच्याकडे असलेल्या सामानात ६.८ किलोग्रॅमच्या ६८ सोन्याच्या काड्या जप्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *