महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ मार्च । पासपोर्टची मागणी लक्षात घेऊन पासपोर्ट विभागाने सामान्य आणि तत्काळ वर्गातील दैनंदिन अपॉइंटमेंट वाढवल्या आहेत. यापुढे पासपोर्ट विभागातर्फे सामान्य पासपोर्ट अर्जांसाठी दिवसाला १०२५ आणि तत्काळ वर्गातील अर्जांसाठी २५० अपॉइंटमेंट देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे वाढलेल्या मागणीमुळे पासपोर्ट विभागाने गेल्या वर्षीच्या तुलनेत पहिल्या दोन महिन्यांतच २९ हजारपेक्षा अधिक पासपोर्ट वितरीत केले आहेत.
लॉकडाउनचे निर्बंध शिथिल झाल्याने ऑनलाइन आंतरराष्ट्रीय बैठका, परिषदा आणि स्पर्धाही आता पूर्ववत झाल्या आहेत. शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली असून, सुट्ट्यांमधील परदेश पर्यटनही वाढले आहे. याचा थेट परिणाम पासपोर्टच्या अपॉइंटमेंटवर झाला आहे. पूर्वी अर्ज भरल्यानंतर दहा दिवसांच्या अंतराने मिळणारी अपॉइमेंट गेल्या महिन्यात तीस दिवसांवर गेली होती.
परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराने दररोज रद्द किंवा पुनर्निर्धारित वेळ घेतल्याने कमी झालेले अपॉइंटमेंट स्लॉट दररोज प्रसिद्ध केले जातात. या रिक्त जागांवर नवीन अर्जदारांना अपॉइंटमेंट दिल्या जातात. पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाची पासपोर्ट सेवा केंद्रे आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये तत्काळ योजनेच्या अपॉइंटमेंट दुपारी बारा वाजता आणि सामान्य पासपोर्टच्या अपॉइंटमेंट साडेआठ वाजता वेबसाइटवर प्रसिद्ध होतात. या वेळेस वेबसाइटवर लॉग इन केल्यास जाहीर झालेल्या रिक्त जागांवर अर्जदारांना अलीकडच्या तारखेची नवीन अपॉइंटमेंट म्हणजेच ‘प्रीपोन’ करता येणार आहे. मात्र, ही सेवा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर अपॉइंटमेंटचे वाटप करते. त्यामुळे ज्यांनी पहिल्यांदा प्रक्रिया पूर्ण केली त्यांनाच ही सुविधा घेता येणार आहे, अशी माहिती पासपोर्ट कार्यालयाने दिली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती https://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/online/tatkaalPassports या लिंकवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पासपोर्टची वाढती मागणी लक्षात घेऊन आम्ही दैनंदिन अपॉइमेंट वाढवल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी (२०२२) आम्ही एक लाख १३ हजारपेक्षा जास्त म्हणजेच २०२१च्या तुलनेत ५० टक्के जास्त पासपोर्ट वितरीत केले होते. या वर्षीही अर्जांची संख्या वाढली आहे. २०२३च्या पहिल्या दोन महिन्यांतच आम्ही गेल्या वर्षीच्या तुलनेत २९ हजार पासपोर्ट वितरीत केले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात एकूण पासपोर्टचे वाटप करण्यात आले आहे.- डॉ. अर्जुन देवरे, पासपोर्ट अधिकारी, पुणे पासपोर्ट विभाग
पासपोर्ट वितरण
(जानेवारी व फेब्रुवारी)
२०२२ : ४५ हजार ७१४
२०२३ : ७४ हजार ७२२
गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ : २९ हजार ००८ (६३ टक्के)