मजुरांनी केलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयघोष कदाचित योगींच्या पचनी पडला नसेल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – लॉकडाऊनच्या काळात दिड महिने महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांची राज्यातील सरकारने योग्य ती काळजी घेतली त्याची पोचपावती म्हणून या मजुरांनी आपल्या घरी रेल्वे जाताना महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयघोष केला होता. त्याच्या व्हिडीओ क्लिप्स आम्ही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवल्या. पण त्या क्लिप्स योगींच्या पचनी पडल्या नसतील, असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवा फतवा काढत उत्तर प्रदेशातील मजुरांना काम द्यायचे असल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल, अशी घोषणा केली. संजय राऊत यांनी त्यांच्या याच वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. बाहेरच्या राज्यातील मजुरांसाठी आता आम्हालाही नियम बनवावे लागतील. सगळ्यांना पारखूनच राज्यात घ्यावे लागेल, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.

महाराष्ट्राला दोष देण्यापेक्षा योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यातील स्थलांतरित मजूर आपापल्या घरी सुखरुप पोहोचले का? त्यांना अन्नपाणी मिळते आहे का? याकडे लक्ष्य द्यायला हवे. कारण देशभरातून गेलेले हिंदी भाषिक मजूर नरक यातना भोगत होते, त्यांना आपल्या गावात आणि घरात जाण्यापासून रोखण्यात आले, हे संपूर्ण देशाने आणि जगाने पाहिले असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अनेक राज्यांनी आभार मानले. कारण त्यांच्या भागातील कामगारांची काळजी महाराष्ट्र सरकारने उत्तम पद्धतीने घेतल्यामुळे त्यांचे त्यांनी कौतुक केले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सर्वांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आणि सरकारी यंत्रणेचे आभार मानले, असे संजय राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *