महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ मार्च । ईडीने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना समन्स बजावले आहे. परंतु, मश्रीफ गेल्या 50 तासांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. आज त्यांना मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या गैरहजेरीत वकिल बाजू मांडणार आहेत. (ED summons for Hasan Mushrif today )
ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर ते गेल्या 50 तासांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. मुश्रीफ यांच्या घरी तब्बल साडेनऊ तास ईडीने झाडाझडती केली आहे. यावेळी आमदार हसन मुश्रीफ घरी नव्हते. ईडीच्या या छापेमारीनंतर मुश्रीफ त्यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
मुश्रीफ यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांनी कुणाशीही संपर्क साधलेला नाही. तसेच आपलं म्हणणंही त्यांनी मांडलं नाही. मुश्रीफ संपर्काबाहेर असल्याने मुश्रीफ गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.
हसन मुश्रीफ त्यांच्या विविध कंपन्यांमार्फत झालेल्या कथेत घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीच्या रडारवर आहेत. दीड महिन्यांपूर्वी हसन मुश्रीफ राहत असलेल्या कागल इथल्या निवासस्थानी ईडीने छापा टाकून दिवसभर त्यांच्या घराची झाडाझडती घेतली होती. तसेच कुटुंबीयांची देखील कसून चौकशी केली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती साखर कारखाना, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक या संस्थांमध्ये हसन मुश्रीफ यांच्यामार्फत कथित घोटाळा झाल्याची तक्रार ईडीकडे प्राप्त झालेली होती.
तसेच हसन मुश्रीफ यांनी विविध बोगस कंपन्यां मार्फत फसवणूक केल्याचा आरोप ही त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये हसन मुश्रीफ आणि त्यांच्या दोन्ही मुलांची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र ही चौकशी सुरू झाल्यापासून मुश्रीफ नॉट रिचेबल झालेले आहेत.