महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ मार्च । देशातील विविध राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू लागला आहे. नागरिकांनी उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये रविवारी (दि.१३) या वर्षातील सर्वाधिक तापमान अनुक्रमे ३४.१ अंश सेल्सिअस आणि ३९.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुढील काही दिवसही तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. सुरक्षित राहण्यासाठी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या स}चना IMD ने दिल्या आहेत.
या आठवड्यातही राहणार उष्णतेची लाट कायम
उष्णतेची लाट या आठवड्यात कायम राहील, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतीय हवामान खात्याच्या संशोधक सुषमा नायर यांच्या मते पूर्वेकडून येणाऱ्या तीव्र वाऱ्यांमुळे समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांच्या मार्गात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढून वातावरण आणखी तापत आहे. त्यामुळे गरज असेल तरच दुपारनंतर बाहेर पडा, असा सल्ला देण्यात आला आहे
डॉक्टरांचा सल्ला…
तहान नसेल तरीही पुरेसे पाणी प्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच हृदयविकार, आकडी, किडनी किंवा आतड्याचा आजार असणाऱ्या लोकांनी अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे मुंबईमध्ये मार्चच्या मध्यापासून ते जूनपर्यंत उन्हाळ्याचा तीव्र हंगाम असतो. यावेळी मात्र आठवडाभर आधीच उकाडा जाणवू लागला आहे. मुंबईचे वातावरण ३० ते ३५ अंशांवर जात असते. यावेळी मात्र ते ३९ पर्यंत गेले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण येऊ शकतो, ज्यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि उष्माघातामुळे गंभीर आजार किंवा मृत्यू टाळण्यासाठी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने काय करावे आणि करू नये याची यादी जारी केली आहे.