अखेर आ. प्रकाश सुर्वेंनी मौन सोडलं; “ज्या कुणी हा व्हिडिओ केला असेल त्यांना..”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ मार्च । गेल्या २-३ दिवसांपासून राज्यात शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरण चांगलेच गाजत आहे. या व्हिडिओचे पडसाद विधिमंडळातही पाहायला मिळाले. यात खासदार संजय राऊतांनी पुरुष आमदार कुठे गायब झालेत. ते का बोलत नाही असा सवाल विचारला होता. त्यानंतर आता पहिल्यांदाच आमदार प्रकाश सुर्वे यांनी या प्रकरणावर मौन सोडले आहे. सुर्वे यांनी पत्र काढून त्यांची बाजू मांडली आहे.

प्रकाश सुर्वे यांनी पत्रात म्हटलंय की, मी गेल्या महिन्याच्या १८ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत प्रकृती कारणास्तव वोकार्ड हॉस्पिटलला दाखल होतो. सध्या मला थ्रोट इंफेक्शनचा त्रास असल्याने आणि सततचा खोकला असल्याने बोलण्यास त्रास होतो. मात्र गेल्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमानंतर मी काही बोलत नाही असा चुकीचा अर्थ काढून अपप्रचार केला जातोय. माझ्या मतदारसंघातील २ मोठ्या प्रकल्पांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. तेव्हा हजारो नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने मोठ्या संख्येने गर्दी करून हजेरी लावली होती. मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात कायम सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे आणि त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे याकरिता जीवापाड मेहनत करून लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य निभावतो असं त्यांनी सांगितले.

तसेच कामाच्या जोरावर आणि जनतेच्या प्रेमामुळेच जनतेने मला दोन वेळा निवडून दिले आहे. मात्र माझ्या विकासकामांच्या धडाक्यामुळे राजकीय जीवनात हताश झालेले माझे विरोधक लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी व्हिडिओ मॉर्फ करून खोटे चारित्रहनन करणे अशा विकृत गोष्टी करत आहेत. त्यांच्याकडे राजकीय नैराश्य दिसून येते. मुख्यमंत्र्यांच्या रॅलीत प्रचंड गर्दी आणि प्रचंड आवाजात मला बहिणी समान असणाऱ्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे मला काही सांगत असतानाच्या व्हिडिओत चुकीचे गाणे घालून महिलांचा अपमान करण्याच्या विकृत मानसिकतेमधून हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला. त्यातून महिलांप्रती असलेली त्यांची मानसिकता दिसून येते असा आरोप आमदार प्रकाश सुर्वे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *