मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ मार्च । मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांनी ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील निवासस्थानापासून सकाळी साडेअकरा वाजता अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे.

भालचंद्र कुलकर्णी यांचं मराठी सिनेमातील योगदान मोठं आहे, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या होत्या. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. ‘झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’, अशा ३०० पेक्षा चित्रपटांत त्यांनी काम केले होते. १९८४ साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.

भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक होते. चित्रपट महामंडळाने त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. जनकवी पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘ब्रँड कोल्हापूर’च्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. हा त्यांचा अखेरचा पुरस्कार ठरला.

चित्रपट महामंडळाच्या सांस्कृतिक, चित्रपट विषयक तसेच आंदोलनात्मक कामातही ते सक्रिय होते. शालिनी, जयप्रभा स्टुडिओचे जतन व्हावे, या लढ्यात ते अग्रभागी होते. त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून ही काम केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *