महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मार्च । जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी राज्यातील १८ लाख शासकीय – निमशासकीय कर्मचारी १४ मार्चपासून संपावर होते. त्यामुळे कामाचा मोठा खोळंबा झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोमवारी त्यांच्याशी चर्चा केली, मात्र कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. ‘सर्व मागण्या तत्त्वत: मान्य आहेत. समितीचा अहवाल येताच जुन्या पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय घेऊ,’ अशी लेखी हमी दिली. त्यावर विश्वास ठेवून कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतला. संपकरी कर्मचाऱ्यांच्या ७ दिवस रजा मंजूर केल्या जातील. त्यांच्या नोटीसाही मागे घेतल्या जातील, असे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. दुपारी त्यांनी मंत्रालयात कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यानंतर विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली, त्यात शिंदेंनी मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची हमी दिली.