महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मार्च । जागतिक बाजारपेठेतील स्थिती आणि रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम सोनं आणि चांदीच्या दरावर झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या दीड वर्षात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडले आहेत. सोनं परवडतं नाही अशी परिस्थिती झाली आहे. 2023 च्या सुरुवातीपासून सोन्याचे दर वाढतच आहेत. आता तर गुढीपाडव्याआधी सोनं साठी पार करतं की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
एक रंजक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? भारतात सोन्यात सर्वात जास्त गुंतवणूक केली जाते. मग दागिने असो किंवा कॉईन असो. आर्थिक अडचण किंवा अडीनडीला उपयोगी पडेल या हिशोबानं का होईना लोकांचा कल हा सोनं खरेदी करण्याकडे असतो. विशेष: सणवार आले की छोटं का होईना सोन्याचं काहीतरी घेतलंच जातं.
सर्वात जास्त सोनं खरेदी करणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. याशिवाय भारतात सोन्याची मोठ्या प्रमाणावर आयातही केली जाते. पण भारतापेक्षा दुबई आणि UAE मध्ये सर्वात स्वस्त सोनं मिळतं ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?
दुबईमध्ये तुम्ही जर गेलात तर तिथे तुम्हाला भारतापेक्षा 5-6 हजार रुपयांचा फरक पडतो. अर्थात तुम्ही इथे 24 कॅरेट सोनं घेतलं तर हा फायदा आहे. मात्र दागिने घेतलेत तर मात्र तुम्हाला 7 टक्के मेकिंग चार्जेस द्यावे लागतात. तिथली मजुरी ही जास्त आहे त्यामुळे दागिने खरेदी करणं तुलनेनं थोडं महाग पडतं असं म्हणायला हरकत नाही.