80 हजार पोलीस असताना अमृतपाल कसा पळून गेला? उच्च न्यायालयाकडून पंजाब सरकारची खरडपट्टी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ मार्च । खलिस्तानी समर्थक आणि ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहच्या अटकेसाठी जंग जंग पछाडलं जात आहे. पंजाब पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी पंजाबात अतिरिक्त फौजफाटा तैनात केला आहे. दरम्यान, 80 हजार इतके पोलीस असूनही अमृतपाल पळून कसा गेला? असा प्रश्न करत पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकारची खरडपट्टी काढली आहे.

अमृतपाल सिंह प्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्यात आल्याची माहिती पंजाब पोलिसांनी उच्च न्यायालयात दिली आहे. या प्रकरणी सुनावणी सुरू असताना पंजाब पोलिसांनी आपला युक्तिवाद सादर केला. त्या युक्तिवादानुसार, पोलिसांकडे जरीही हत्यारं असली तरीही त्यांना बळाचा वापर करण्यापासून थांबवण्यात आलं होतं. काही प्रकरणं ही इतकी संवेदनशील असतात की पोलीस त्याबाबत न्यायालयासमोर सांगू शकत नाहीत. आम्ही त्याला पकडण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, असं न्यायालयासमोर पंजाब पोलिसांतर्फे सांगण्यात आलं.

त्या युक्तिवादाला अमान्य करत न्यायालय म्हणालं की, पंजाब सरकारची गुप्तचर यंत्रणा संपूर्णतः निरुपयोगी ठरली आहे. जर त्याला पकडण्याची पूर्ण तयारी केली गेली होती, तर तो पळून कसा गेला? तो वगळून त्याच्या आसपासच्या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. आम्हाला पोलिसांच्या कथनावर विश्वास नाही. इतक्या कडेकोट बंदोबस्तात जर तो पळून जाण्यात यशस्वी ठरला असेल तर ही सगळी गुप्त योजना आणि यंत्रणा निरुपयोगी आहे, असं म्हणावं लागेल. 80 हजार पोलिसांमधून तो निसटून गेला, तर पोलीस त्यावेळी काय करत होते? असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी उपस्थित केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *