आशिया चषक पाकिस्तानात ; हिंदुस्थानी संघाचे सामने कुठे होणार? पाहा व्हेन्यू

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मार्च । यंदा पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेच्या प्रकरणी तोडगा निघताना दिसत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) आशिया चषक आपल्या देशात आयोजित करण्यासाठी आणि या स्पर्धेत भारतीय संघाचे सामने खेळवण्यासाठी नवीन योजना आखली आहे. या योजनेनुसार भारतीय संघाला ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्याचीही गरज भासणार नाही.

आशिया कप २०२३ चे पाकिस्तानमध्येच खेळवले जाऊ शकतात. तर भारतीय संघ आपले सामने दुसऱ्या देशात खेळणार आहे. आशिया कप आयोजित करण्यासाठी पीसीबीने हा पर्याय शोधला आहे. भारतीय संघ युएई, ओमान, श्रीलंका किंवा इंग्लंड यापैकी कोणत्याही एका देशात आपले सामने खेळू शकेल.

आशिया चषकासंदर्भात टीम इंडियाच्या सामन्यांचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. ESPNcricinfo ने आपल्या रिपोर्टमध्ये या संपूर्ण प्लॅनची माहिती दिली आहे. भारतीय संघाच्या सामन्यांचं ठिकाण ठरवण्यासाठी त्या देशातील हवामानाची विशेष काळजी घेतली जाईल.

आशिया चषक यावर्षी सप्टेंबरमध्ये पार पडणार आहे. अशा परिस्थितीत, यूएईमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीला तापमान साधारणपणे ४० अंशांच्या आसपास राहते. मात्र, अशा स्थितीतही तिथे क्रिकेट खेळले जाते.

आयपीएल २०२१ चा हंगामही सप्टेंबरच्या अखेरीस येथे खेळला गेला. २०२१ T20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीचे काही सामने ओमानची राजधानी मस्कत येथेही झाले आहेत. तसंच इंग्लंड देखील एक चांगला पर्याय असू शकतो.

यावेळीही आशिया चषक स्पर्धेत केवळ ६ संघ सहभागी होणार आहेत. हे संघ भारत, पाकिस्तान, गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि एक एक क्वालिफायर टीम असेल. हे सर्व संघ दोन गटात विभागले जाणार आहेत. दोन्ही गटांतर्गत ६ संघांमध्ये एकूण ६ सामने खेळवले जाणार आहेत.

यानंतर दोन्ही गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीत ४ संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने एकूण ६ सामने खेळवले जातील. यानंतर दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील आणि त्यांच्यामध्ये विजेतेपदाचा सामना खेळला जाईल. अशा प्रकारे आशिया कप २०२३ मध्ये अंतिम सामन्यासह एकूण १३ सामने खेळवले जाणार आहेत.

यावेळी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. या गटातील तिसरा संघ पात्रता फेरीतून निश्चित केला जाईल. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात असतील. यावेळीही स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान तीन सामने होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *