महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ मार्च । मी लोकांना सांगतो, तुम्हाला पटलं तर मतं द्या. नाहीतर देऊ नका. मी आता फार काही कुणाला लोणी लावायला तयार नाही. कुणीतरी नवीन येईल, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गडकरी यांच्या या वक्तव्याची पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
वनराई फाऊंडेशनच्या वतीने प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आगामी लोकसभा निवडणूक नागपुरातून गडकरी लढणार की नाही, याविषयी चर्चा जोरात आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्टवक्ते असून ते सडेतोड बोलण्यासाठी नेहमी ओळखले जातात. बोलताना ते कुठलीही भीडमुर्वत ठेवत नाहीत. यापूर्वीही त्यांनी अनेकदा आपल्या राजकीय वाटचालीसंबंधी अतिशय सडेतोड भावना व्यक्त केल्या आहेत. या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, राजकारण म्हणजे पैसा कमावण्याचा धंदा नाही. राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आणि धर्मकारण आहे. तर, राजनीती म्हणजे लोकनीती, धर्मनीती आहे. सामाजिक-आर्थिक परिवर्तन राजकारणातील उद्दिष्टे आहेत. त्यामुळे समाजाची विशेषत: गोरगरिबांची सेवा राजकारणातून होणे अपेक्षित आहे, असेही गडकरी म्हणाले. अर्थातच गडकरींच्या या कानपिचक्या नेमक्या कुणाला ?अशीही चर्चा रंगली.