इम्तियाज जलील यांचं थेट राम मंदिरातून लाइव्ह ; हात जोडून केली ‘ही’ विनंती

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० मार्च । किराडपुरा येथील जुन्या राम मंदिर परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाली. एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे औरंगाबादमध्ये तणाव निर्माण झाला आहे. रमजान महिना सुरू आहे. त्यातच आज राम नवमी आहे. त्यामुळे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत. अफवा पसरू नये म्हणून आवाहन केलं जात आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही ज्या राम मंदिर परिसरात राडा झाला, त्या मंदिराला भेट दिली. मंदिरातूनच लाइव्ह करत मंदिराला कोणतंही नुकसान झालं नसल्याचं सांगितलं. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही केलं.

किराडपुरा येथील जुन्या राम मंदिर परिसराला कालच्या राड्यामध्ये नुकसान झाल्याच्या अफवा उठल्या होत्या. या अफवा असून त्यात काही तथ्य नसल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. खासदार इम्तियाज जलील यांनी तर थेट त्या राम मंदिरातच धाव घेतली. मंदिराची पाहणी केली. तसेच तिथूनच लाइव्ह करत लोकांना मंदिर दाखवलं. मंदिराचं कोणतंही नुकसान झालं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. मी किराडपुरातील राम मंदिरात आहे. मी स्वत: राममंदिरात आलो आहे. मी स्वत: मंदिराची पाहणी केली आहे. मंदिरात काहीच नुकसान झालं नाही. बाहेरही नुकसान नाही. कुणी काही अफवा पसरवत असेल तर अफवांवर विश्वास ठेवू नका. शांतता राखा, असं आवाहन इम्तियाज जलील यांनी केलं आहे.

सणात खोडा घालू नका
मी हात जोडून विनंती करतो. रमजान महिना सुरू आहे. आज राम नवमी आहे. दोन्ही सण महत्त्वाचे आहेत. हात जोडून विनंती करतो, या चांगल्या सणात खोडा घालू नका. काही लोकांमुळे सणांना गालबोट लागू देऊ नका. आपल्या घरात राहा. सण साजरा करा. शहरातील शांतता कायम राखा. तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे, असं जलील म्हणाले.

कोम्बिंग ऑपरेशन करा
सर्व सण उत्सव आपण एकत्र साजरा करतो. काही अनुचित प्रकार घडला. काही समाजकंटकांनी जुन्या राममंदिर येथे वातावरण बिघडवण्याचं काम केलं. त्यामुळे काही नुकसान झालं आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की राम मंदिराला कोणतंही नुकसान झालं नाही. राम मंदिरात कोणी आलं नाही. तिथे राहणारे, काम करणारे लोक आणि पुजारी सर्व सुरक्षित आहेत. सर्व सुरक्षित आहेत. मीही पोलिसांना विनंती करतोय की जे समाजकंटक होते त्यात नशेखोर तरुणही होते. त्यांना आपण काय करतोय हे कळत नव्हतं, त्यांना अटक करावी. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून ड्रग्जचा व्यवसाय करणारे आणि ड्रग्ज घेणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच सीसीटीव्ही पाहून आरोपींना ताब्यात घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *