![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१ एप्रिल । महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी (१ एप्रिलपासून) घरगुती ग्राहकांना वीजदरात दहा टक्के तर, १ एप्रिल २०२४ पासून आणखी १७ टक्क्यांनी दरवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल आकारणीमध्ये १८ टक्के दरवाढी पाठोपाठ १ एप्रिलपासून सामान्य माणसांवर ही दुसरी दरवाढ लादली गेली आहे.
नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. शनिवारपासून वीजदर महाग झाले आहेत. याचा परिणाम प्रत्येक घरगुती ग्राहकांवर होणार आहे. आता दर महिन्याला त्यांना वीज वापरासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने १ एप्रिलसपासून नवीन दर लागू केले आहेत. वीज वितरणच्या प्रामुख्याने चार कंपन्या आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड राज्य सरकारद्वारे चालवली जाते. ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची उपकंपनी आहे. ही कंपनी वीजदराची आकारणी करते. आधीच वीजबिलांच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या महावितरणला वीजदरात वाढ केल्यामुळे काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.