हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ; पुण्यात 9 ठिकाणी ईडीची मोठी छापेमारी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ एप्रिल । माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अंमलबजावणी संचनालय यांनी पुण्यात मोठी कारवाई सुरू केली आहे. सोमवारी सकाळीच​​​​​​ पुण्यात 9 ठिकाणी एकाचवेळी ईडीची मोठी छापेमारी सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे.

हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील व्यवसायिकांच्या घरी ही कारवाई करण्यात येत आहे. व्यवसायिक विवेक गव्हाणे, सी.ए. जयेश दुधेडीया आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. पुणे शहरातील सॉलसबारी पार्क, गणेश पेठ, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह इतर ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलिस बंदोबस्त ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोबत ठेवलेला आहे.

आर्थिक व्यवहारांची तपासणी
ईडी छापेमारी करत असलेल्या ठिकाणांच्या जागेवर जाण्यास इतरांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे. यांच्याशी संबंधित वेगवेगळे व्यवसायिक यांच्याशी नेमके कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले आहेत, त्याची कोणती कागदपत्रे आहेत त्याबाबत कोणते पुरावे मिळू शकतात का ? याबाबतची तपासणी ईडीच्या पथकामार्फत करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा बँकेचीही चौकशी
हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित नातेवाईक व्यवसायिकांवर यापूर्वीही ईडीने छापेमारी करत कारवाई केलेली आहे. त्यानंतर पुन्हा सोमवारी मोठ्या प्रमाणात छापेमारी होत असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. आमदार हसन मुश्रीफ सध्या इडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या निवासस्थानावर आतापर्यंत तीन वेळा छापेमारी करण्यात आली आहे. ते अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेचीही चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *