बँकांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप त्वरित करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – बँकांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे. ज्या शेतकऱ्यांचे आधीचे पीककर्ज थकीत असेल, त्यांना राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनाही पीक कर्ज देण्यात यावे, त्यांचे थकीत पीक कर्ज भरण्याची हमी राज्य शासनाने कर्जमुक्ती योजनेतून घेतली आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज विविध बँकांना दिली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय बँकर्स समितीची १४७ वी बैठक व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मनोज सौनिक, आशिषकुमार सिंह, विकास खारगे, आभा शुक्ला, एकनाथ डवले आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केंद्र शासनाचे प्रतिनिधी, भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी, नाबार्डचे प्रतिनिधी, राज्यातील विविध बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. एप्रिल २०२० अखेर ही योजना संपायला पाहिजे होती. पण कोरोनाच्या संकटामुळे काही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती बाकी राहिली आहे. बँकांनी आता येत्या खरीप हंगामासाठी या शेतकऱ्यांची खाती थकीत गृहीत न धरता त्यांनाही नवीन पीक कर्ज देणे गरजेचे आहे. या शेतकऱ्यांचे आधीचे थकीत कर्ज मुक्त करण्याची हमी राज्य शासन घेत आहे, असे ते म्हणाले. यंदाचा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज आहे. कोरोनाच्या काळात शेतकरीही मोठ्या संकटात आला आहे. पुढील हंगामासाठी शेतकऱ्याला आपण सर्वांनी मिळून साथ देऊया. सर्वजण मिळून कोरोनाच्या संकटावर मात करुया, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *