महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ एप्रिल । येथील ‘नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट’मधील (एनजीआरआय) शास्त्रज्ञांना आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात अशी 15 दुर्मीळ खनिजे सापडली आहेत, ज्यांचा उपयोग दैनंदिन जीवनात तर होतोच, पण उद्योगांमध्येही केला जातो. मोबाईल फोन्स, टीव्ही, कॉम्प्युटर्स आणि वाहनांसाठी ही खनिजे उपयुक्त ठरतात.
एनजीआरआयचे शास्त्रज्ञ जेव्हा अपारंपरिक खडकांचा अभ्यास करीत होते, तेव्हा त्यांना हा खजिना सापडला. एनजीआरआयचे शास्त्रज्ञ पीव्ही सुंदर राजू या संशोधनाबद्दल माहिती देताना म्हणाले, रेड्डीपल्ली आणि पेद्दवाडगुरू या गावांच्या परिसरात झरकॉन खनिजाचे वेगवेगळ्या आकारातील खडक सापडले. मोझानाईटच्या खडकांमध्ये विविध रंग दिसून आले. या खडकांना भेगाही पडलेल्या होत्या. यावरून या खडकात किरणोत्सारी (रेडिओअॅक्टिव्ह) घटक असल्याचे स्पष्ट होते. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राजू म्हणाले, या यशामुळे या संपूर्ण परिसराचा आणि तेथे सापडलेल्या खनिजयुक्त खडकांचा अधिक सखोल अभ्यास केला जाणार आहे.
कडप्पा खोर्यात खजिना
भूगर्भशास्त्रातील मेटॅलोजेनी या शाखेत भूगर्भाचा त्या परिसराशी असलेला ऐतिहासिक संबंध शोधण्याचा अभ्यास केला जातो. त्यात तेथे आढळणार्या खनिजांचाही सखोल अभ्यास अंतर्भूत असतो. या शाखेचे शास्त्रज्ञ आता पुढील संशोधनासाठी सज्ज आहेत, असे एनजीआरआयकडून सांगण्यात आले.
बहुपयोगी खनिजांचा साठा
या खनिजांत अॅलानाईट, सिरिएट, थोराईट, कोलम्बाईट, टेन्टालाईट, अॅपाटाईट, झरकॉन, मोनाझाईट, पायरोक्लेअर युक्झेनाईट आणि फ्लोराईट यांचा समावेश आहे. ही खनिजे स्वच्छ ऊर्जा, अंतराळ, संरक्षण, कायमस्वरूपी चुंबके, पवनचक्क्या, जेट विमाने आणि इतर अनेक उत्पादनांमध्ये वापरले जातात.
खनिजांची व्याप्ती
18 चौ.कि.मी.मध्ये दंचेरला, पेद्दवादुगुरू, दंडुवरिपल्ली, रेड्डीपल्ली, चिंतलचेरवू आणि पुलिकोंडा या अनंतपूर व चित्तूर जिल्ह्यांतील गावांमध्ये ही खनिजे मोठ्या प्रमाणावर सापडू शकतात. मुख्य साठा दंचेरला गावाच्या परिसरात अंडाकार भूभागात असून, त्याचे क्षेत्रफळ 18 चौरस किमी आहे.