कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता तीन राज्यांमध्ये मास्क अनिवार्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० एप्रिल । देशातील बहुतांश भागात कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता सरकारकडून पुन्हा निर्बंध लागू केले जात आहेत. अनेक राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे पुन्हा बंधनकारक केले आहे, तर अनेक राज्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील सर्व रुग्णालये, पॉलिक्लिनिक आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना संसर्गामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्जतेचा आढावा घेण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी देशभरात मॉकड्रिल घेण्याची तयारी सुरू आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, हरयाणा सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. जिल्हा प्रशासन आणि पंचायतींनाही कोरोना प्रोटोकॉल पाळले जातील, याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, केरळ सरकारने गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त लोकांसाठी मास्क अनिवार्य केले आहेत.

पुद्दुचेरी प्रशासनाने तत्काळ प्रभावाने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत. याशिवाय, उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रीनिंग सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह आढळलेले नमुने पाठवण्यासही सरकारी आदेशात सांगण्यात आले आहे.कोरोना संसर्गामुळे कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी देशभरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दोन दिवस मॉकड्रिल होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य मंत्री आणि आरोग्य विभागाचे प्रधान आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यासमवेत आढावा बैठकीत तयारीची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया सोमवारी झज्जर येथील एम्सला भेट देणार असून तयारीचा आढावा घेणार आहेत. लोकांनी घाबरू नये, सतर्क राहावे, असे मनसुख मांडविया यांनी म्हटले आहे. अलीकडेच झालेल्या संसर्गाचा सामना करण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे. आयसीयू बेड, ऑक्सिजन पुरवठा आणि इतर आवश्यक उपकरणे आणि पुरवठा यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तयारीचा साप्ताहिक आढावाही घेतला जात आहे, असे मनसुख मांडविया यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *