महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० एप्रिल । आजपर्यंत आपण सामान्यपणे काळ्या रंगाचेच कावळे पहात आलो आहोत. पण पुण्यात आज चक्क पांढऱ्या रंगाचा कावळा आढळून आला आहे. पुण्यातील लुल्ला नगर परिसरामध्ये हा पांढरा कावळा पहायला मिळाला. कावळ्याचा रंग पांढरा असल्यामुळे हा कावळा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. एकूणच पांढऱ्या रंगाचा कावळा पाहिल्यानंतर नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.
दोन वर्षांपूर्वीही आढळला होता पांढरा कावळा
काळ्या कावळ्यांच्या समूहामध्ये अशा प्रकारचा पांढरा कावळा दिसल्यावर साहजिकच आश्चर्य वाटण्यासारखी बाब आहे. या आधीही दोन वर्षांपूर्वी शिरूर भागामध्ये अशा प्रकारचा कावळा लोकांच्या दृष्टीस पडला होता. पांढरा कावळा पाहिल्यानंतर परिसरातील नागरिक या कावळ्याचे छायाचित्र घेत आहेत.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार अशा प्रकारचा कावळा हा दहा हजार कावळ्यांमधून एखादा सापडतो. जनुकीय विकारामुळे कावळ्यांमध्ये अल्बिनिझम किंवा ल्यूसिझम म्हणजे पंखांमध्ये रंगद्रव्य साठवण्याची क्षमता कमी होते. रंगद्रव्य साठवण्याची क्षमता कमी झाल्यानं पांढऱ्या रंगाचे कावळे आढळून येतात.