तैयो नो तामांगो ‘हा’ आहे जगातील सर्वात महागडा आंबा ; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० एप्रिल । उन्हाळा ऋतुसह आता खऱ्या अर्थाने आंब्यांचा हंगामही सुरु झाला आहे. बाजारात आंब्यांचे अनेक प्रकार दिसू लागले आहेत. यामुळे आंब्यांच्या मागणीतही वाढ होताना दिसतेय. आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. वर्षातून एकदा येणारे हे फळ अनेकांच्या आवडीचे आहे. भारतात प्रत्येक राज्यानुसार, आंब्याची जात बदलते. म्हणजे कोकणात हापूस, पायरी आंबा मिळतो, त्याप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये लंगडा, बदामी, दसरी, चौसा, तोतापरी, केसर या जातींचा आंबा मिळतो. तु्म्ही देखील यातील अनेक आंब्यांचे प्रकार चाखले असतील. पण केवळ भारतातच नाही तर परदेशातही आंब्यांचे उत्पादन घेतले जाते. जगातील विविध देशांतील आंब्यांचीही स्वत:ची एक खासियत आहे. पण तुम्हाला आम्ही आज अशा जगातील सर्वात महागड्या आंब्याबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल.

जगातील सर्वात महाग आंब्याला ‘तैयो नो तामांगो’ या नावाने ओळखले जाते. ज्याचा अर्थ जपानी भाषेत ‘सूर्याची अंडी’ असा आहे. ही आंब्याची एक दुर्मिळ जात आहे. जपानमधील मियाझाकी शहरात याची लागवड केली जाते. मियाझाकी हे शहर जपानच्या दक्षिणेकडील भागात स्थित आहे, जे उबदार आणि चांगल्या हवामानासाठी ओळखले जाते. साधारणपणे एप्रिल ते जुलैदरम्यान या आंब्याचे उत्पादन घेता येते. ‘तैयो नो तामांगो’ आंबा हा त्याच्या गोड चवीसाठी आणि मऊ पोत यासाठी ओळखला जातो. जपानमधील एक सर्वात लक्झरी फळ मानले जाते. या आंब्याची विशेष बाब म्हणजे ते अत्यंत मर्यादत प्रमाणात पिकवले जाते आणि त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी काळजीपूर्वक हाताने उचलून पॅक केले जातात.

या आंब्याची किंमत किती?
जपानमध्ये २०१९ साली तैयो नो तामांगो या जातीचे दोन आंबे लिलावात ५ मिलियन येन या विक्रमी किंमतीत विकले गेले. भारतीय चलनात पाहिला तर या दोन आंब्याची किंमत ३६ लाख रुपये आहे. म्हणून या आंब्याला जगातील सर्वात महागडा आंबा मानले जाते. तैयो नो तामांगो आंबाचा उच्च दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ते प्रगत तंत्र वापरून काळजीपूर्वक पिकवले जातात. त्याची वाहतूकही विशेष पॅकिंगनंतर केली जाते. हे फळ अस्सल असल्याची खात्री करण्यासाठी त्याच्या बॉक्सवर सत्यतेचे प्रमाणपत्र देखील असते. तैयो नो तामांगो हे आंबे अनेकदा महागडी भेटवस्तू म्हणून दिले जातात. त्याचबरोबर फळांचे शौकीन असणारे श्रीमंत लोक हे आंबे आवडीने खातात.

या आंब्याचे वैशिष्ट्य
तैयो नो तामांगो हा आंबा सरासरी वजनाला सुमारे ३५० ग्रॅम असतो. तसेच त्यातील साखरेचे प्रमाण हे सामान्य जातीच्या आंब्यांपेक्षा १५ टक्के जास्त असते. याशिवाय यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक एसिड भरपूर प्रमाणात आढळते. जांभळ्या रंगाचा हा आंबा आता बांगलादेश, भारत, थायलंड आणि फिलिपाइन्समध्येही पिकवला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *