पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? लागले भावी खासदाराचे पोस्टर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० एप्रिल । पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. आता या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत चर्चा सुरू झाली आहे. भाजप आणि मविआकडून उमेदवारांची चाचपणी देखील सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. भाजपकडून गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहळ आणि माजी खासदार संजय काकडे यांचं नाव आघाडीवर आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांची नावं चर्चेत आहेत.

राष्ट्रवादीचा दावा

महाविकास आघाडीमधून पुणे लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचं तिकीट काँग्रेस उमेदवाराला दिलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आता या जागेसाठी राष्ट्रवादी देखील इच्छूक असल्याचं समोर आलं आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून पुण्यनगरीचे भावी खासदार प्रशांत जगताप अशा आशयाची बॅनरबाजी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून जागा काँग्रेसची असल्याचा दावा केला जात आहे. मात्र आता राष्ट्रवादीही लोकसभा लढवण्यासाठी इच्छूक असल्याचं बॅनरवरून स्पष्ट होत आहे.

भाजपकडून तीन नावं चर्चेत

दरम्यान दुसरीकडे भाजपकडून देखील लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारंची चाचपणी सुरू आहे. भाजपकडून गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहळ आणि माजी खासदार संजय काकडे यांचं नाव चर्चेत आहे. सुरुवातील शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि मेधा कुलकर्णी यांचं नाव देखील चर्चेत होतं. मात्र ही नावं मागे पडली असून, स्वरदा बापट आणि मोहळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

बंडखोरीची शक्यता

तर दुसरीकडे काँग्रेसकडून देखील आमदार रवींद्र धंगेकर आणि मोहन जोशी यांचं नाव खासदारकीच्या पोटनिवडणुकीसाठी चर्चेत आहे. मात्र आता राष्ट्रवादीकडून देखील दावा करण्यात आल्यानं महविकास आघाडीत पुन्हा बंडखोरी होणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *