महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ एप्रिल । समाज माध्यमांमधून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी बातमी व्हायरल होत आहे. सुप्रिम कोर्टात एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईवर शिक्कामोर्तब होणार असून त्यापूर्वीच एकनाथ शिंदे राजीनामा देतील आणि विखे पाटील राज्याचे मुख्यमंत्री होतील अशा वावड्या उठवल्या जात आहेत. यासंदर्भात स्वतः विखे पाटलांनी स्पष्टीकरण देत, हे माझ्या बदनामीचे षडयंत्र असल्याचं म्हंटल आहे.
व्हायरल बातमी संदर्भात बोलताना विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) पुढे म्हणाले की, माझ्या संदर्भात पसरविले जात असणारे वृत्त हे कपोलकल्पीत आणि मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे.अशा वावड्या पसरविण्याचे काम काही मंडळी करीत असून माझी बदनामी करण्याचा हेतू आहे.
या वृतांमध्ये कोणतेही तथ्य नाही. राज्याला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व मिळाले आहे. राज्याचा निर्णय हा प्रधानमंत्र्याच्या स्तरावर झाला असल्याने यामध्ये कुठलीही विसंगती असण्याचे कारण नाही असे स्पष्ट मत महसूलमंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.