कुणाशीही चर्चा न करता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला, त्यामुळे…; शरद पवारांचे मोठं विधान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ एप्रिल । मागील काही दिवसांपासून शरद पवार हे राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. अदानी प्रकरण असो वा इतर मुद्द्यांवरून पवारांचे मत हे विरोधी पक्षांशी जुळत नसल्याचे समोर आले. त्यात आता महाविकास आघाडीतील झालेल्या मतभेदांवर शरद पवारांनी उघडपणे भाष्य केले आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी चर्चा न करता राजीनामा दिला असं विधान शरद पवारांनी केले आहे.

शरद पवार म्हणाले की, मविआ सरकार तीन पक्षांची संख्या एक करून तयार झाले होते. सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. त्यात कुणी जर राजीनामा देत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांशी संवाद साधणे आवश्यक होते. चर्चा न करता निर्णय घेणे याचे दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने त्यावेळी ही चर्चा झाली नाही ही वस्तूस्थिती टाळता येत नाही असं त्यांनी म्हटलं. एबीपीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

ठाकरे-फडणवीसांचे कान टोचले
राजकीय आरोप प्रत्यारोपात फडतूस-काडतूसवरून भाजपा-ठाकरे गटात रणकंदन माजलं होते. त्यावर पवारांनी नाराजी व्यक्त केली. मला महाराष्ट्राची संस्कृती, येथील लोकांची मानसिकता माहिती आहे. वैयक्तिक हल्ला टाळा, राजकीय मुद्दे घ्या, लोकांचे प्रश्न घ्या. वैयक्तिक टीका-टिप्पणी, चिखलफेक होऊ नये. हे टाळण्याचे काम जाणीवपूर्वक केले पाहिजे असं सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीसांचे कान टोचले.

जेपीसीवरून मविआत मतभेद
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणावरून घेतलेल्या भूमिकेवर महाविकास आघाडीमध्ये तीव्र मतभेद समोर आले होते. काँग्रेसने शरद पवार यांचे मत वैयक्तिक असल्याचे सांगत त्यांच्या भूमिकेशी असहमती दर्शवली. सत्य परिस्थिती बाहेर यायची असेल तर जेपीसी गरजेची आहे. शरद पवार यांचे वेगळे मत असले तरीही जेपीसी चौकशीवर काँग्रेस ठाम असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले तर पवार यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षांच्या एकजुटीवर परिणाम होणार नाही. त्यांनी कुणाला क्लीनचिट दिलेली नाही. चौकशी कशी करावी, यावर त्यांनी मत मांडले आहे अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *