महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ एप्रिल । पूर्वी राजकारणात सभ्यता, सुसंस्कृतपणा, कामाची एक विशिष्ट पद्धत होती. आता या सगळय़ाची कमतरता राजकारणात जाणवते. आता टीकाटिप्पणी करताना वापरली जाणारी भाषा, मांडणी यातून हरवलेली सुसंस्कृतता दिसते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केले. महाराष्ट्रातील राजकीय कथानकाच्या मांडणीतून राजकीय प्रवृत्ती, सत्तेचा सोंगटय़ांचा खेळ मांडणाऱ्या सिंहासन या चित्रपटाला ४४ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात पवार बोलत होते.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या या चर्चासत्रात खासदार सुप्रिया सुळे, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, नाना पाटेकर सहभागी झाले होते. ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र आणि राजीव खांडेकर यांनी उपस्थितांना बोलते केले. ‘सिंहासन ४४’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिग्दर्शक, कलाकार यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सिंहासन ४४ वर्षे झाली तरी आजही कालबाह्य वाटत नाही किंवा तो चित्रपट आजही स्मरणात राहतो त्याचे श्रेय अरुण साधू आणि विजय तेंडुलकर यांचे आहे. पत्रकार, लेखक अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन्ही कादंबऱ्यांवर आधारित चित्रपटाची पटकथा ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांनी लिहिली. दर दहा वर्षांनी राजकारण बदलते तरीही या चित्रपटातील काहीतरी प्रत्येकाला कालसुसंगत वाटते, असे पटेल म्हणाले. सिंहासन चित्रपट ज्यावळी प्रदर्शित झाला त्यावेळी रंगीत चित्रपटांचा काळ आला होता. परंतु तेव्हाची पत्रकारिता ही कृष्णधवल असल्याकारणाने आणि राजकीय व्यक्तिमत्त्व हे रंगीत दाखवू नये असा विचार डोक्यात असल्याने जाणीवपूर्वक कृष्णधवल चित्रपट साकारला. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. मंत्रालय, जुने सह्याद्री अतिथी गृह, मंत्र्यांचे बंगले येथे चित्रीकरण करण्याची परवानगी पवार यांनी दिली, असेही पटेल यांनी सांगितले.
मुख्यमंत्री व्हायचे तर चर्चा करायची नसते सिंहासन चित्रपटात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंडाळी करून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडायचा मंत्र्याचा डाव शिजत असताना प्रत्येक मंत्री मीच ज्येष्ठ असल्यामुळे मुख्यमंत्री होण्यास कसा पात्र आहे हे एकमेकाला पटवून देत असतो, असे दृष्य आहे. त्याचा उल्लेख करून छेडले असता खरच मुख्यमंत्री व्हायचे असेल तर चर्चा करायची नसते, अशी टिपण्णी पवार यांनी केली. सिंहासन चित्रपटातील व्यक्तिरेखा या अनेक तत्कालीन मंत्र्यांशी साधर्म्य असलेल्या वाटल्या, असेही पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.