चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीत पोलिसांची छापेमारी ; काळे धंदे पाहून चक्रावले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ एप्रिल । मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाच बुकींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिंचवडमधील एका उच्चभ्रू सोसायटीत बंद फ्लॅटमध्ये सट्टा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे.

गोविंद प्रभुदास लालवानी (वय ४५ वर्ष) , कन्हैयालाल सुगुणुमल हरजानी (वय ६१ वर्ष), देवानंद प्रतापराय दरयानी (वय ५१ वर्ष), नीरमेश दयाराम मिरानी (वय ६३ वर्ष), हरेश हनुमंत थटाई (वय ५८ वर्ष, सर्व राहणार पिंपरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुन्हे शाखा युनिट २ यांना चिंचवड गाव येथील मेट्रो पोलिटिन सोसायटी येथे सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने व पोलीस अंमलदार जयवंत राऊत, प्रमोद चेताळ, देवा राऊत, सागर अवसरे यांचे पथकाने मेट्रोपोलीटीन सोसायटी चिंचवडगांव येथे सापळा लावला. बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ६०२ मध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा घेत असल्याची खात्री होताच छापा मारुन त्या ठिकाणी असलेल्या एकूण ५ बुकींना ताब्यात घेतले आहे.

त्यांच्याकडून १४ मोबाईल, १ लॅपटॉप, २ वायफाय, २ कॅल्युलेटर, जुगाराची साधने व रोख रक्कम असा सुमारे एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. ताब्यात घेण्यात आलेल्या बुकींच्या मोबाईलमध्ये ताज ७७७ नावाच्या अॅपवर टीव्हीवरील प्रक्षेपणापूर्वी एक बॉल अगोदर दिसते, याचा फायदा घेऊन ते क्रिकेट सामन्यावर लोकांकडून ऑनलाईन सट्टा घेत होते.

या इसमांनी आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेकायदेशीर सट्टा घेऊन बेहिशोबी आर्थिक उलाढाल करून शासनाची फसवणूक केली व अवैधरित्या जुगार चालविल्याने महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करुन चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्हयाची व्याप्ती मोठी असुन महाराष्ट्र राज्यातील व राज्याच्या बाहेरील बुकींची साखळी असण्याची शक्यता असल्याने गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट २ कडून सुरु असून पोलीस उप निरीक्षक गणेश माने अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *