महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ एप्रिल । महाविकास आघाडीची नागपूरात दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. दरम्यान, विरोधपक्ष नेते अजित पवार या सभेला उपस्थित राहणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. ( Maha Vikas Aghadi Vajramuth Sabha nagpur Ajit Pawar maharashtra politics )
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते, मात्र ते नागपुरातील सभेला हजर राहणार आहेत. तर आजच्या सभेला अजित पवारांच्या उपस्थितीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवार हे या सभेत बोलणार का? काय बोलणार? असे अनेक सवाल उपस्थित होतायत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री पाहून लोकांनी त्यांना निवडून दिले नसल्याचे म्हणत अजित पवारांनी त्यांची पाठराखण केली. त्यानंतर अजित पवार नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चा आल्या. त्यासाठी त्यांनी प्रकृतीचे कारण दिले.
मात्र, लगेच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जरंडेश्वर कारखाना प्रकरणी क्लिनचीट मिळाल्याची बातमी आली. या सर्वा घडामोडींमुले अजित पवार सभेत बोलणार नसल्याची चर्चा रंगली आहे.
पवारांकडून पाठराखण
नागपूर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला. भारतीय जनता पक्षाचा गड. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची भूमिका डळमळीत झालेली दिसते. स्वतः शरद पवारांनी उद्योगपती अदाणींची पाठराखण करत त्यांच्या जेपीसी चौकशीची गरज नसल्याचे सांगितले.