महाबळेश्वर, पाचगणीला अवकाळीने झोडपले, तुफान गारपीट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ एप्रिल । महाबळेश्वर, पाचगणी परिसराला शनिवारी रात्री अवकाळी पावसाने झोडपून काढले. सलग तिसऱया दिवशीही तुफान गारपीट आणि वादळामुळे स्ट्रॉबेरीसह इतर पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक झाडे पडल्याने पर्यटकांच्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

महाबळेश्वर, पाचगणी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. दुपारपर्यंत कडक ऊन, त्यानंतर ढगाळ वातावरण आणि रात्री वादळी वाऱयासह पाऊस आणि गारपीट असा प्रकार सुरू आहे. शनिवारी सायंकाळी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱयासह पावसाला सुरुवात झाली. या पावसाने नागरिकांसह पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. पाचगणी, भिलार परिसरात काही वृक्षही उमळून पडले होते.

पाचगणी परिसरात पाण्याची तळी साचली होती. शहराच्या विविध भागांत वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे उकाडा आणखीनच त्रासदायक झाला. उशिरा काही भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू झाला होता. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडे तसेच मोठय़ा फांद्या पडल्यामुळे अनेक भागांत रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झालेला होता.

भिलार परिसरात स्ट्रॉबेरी पिकाला मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे. स्ट्रॉबेरी ग्रोस असोसिएशनचे अध्यक्ष नितीन भिलारे यांनी नुकसान झालेल्या स्ट्रॉबेरीच्या पिकांची पाहणी केली व नुकसान भरपाईची मागणी केली आहे. जोराच्या वाऱ्यामुळे कैऱ्यांसह मोहोर गळून पडल्याने आंबा उत्पादक शेतकऱयांना मोठा फटका बसला.

दररोज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पाचगणी, महाबळेश्वर, जावळी तालुक्यात विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस पडत आहे. पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीसह भिलार या भागात जोरदार गारपीट झाली. अचानक पाऊस आल्याने महाबळेश्वर मार्केटमध्येही पर्यटकांची धावपळ उडाली.

भिलार-भोसेखिंड परिसरात मनामा फॅक्टरीजवळ पार्क केलेल्या कारवर भलेमोठे झाड कोसळल्याने त्या कारचे नुकसान झाले. ठिकठिकाणच्या रस्त्यांवर झाडे पडल्याने महाबळेश्वर-पाचगणी वाहतूक विस्कळीत झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *