महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ एप्रिल । विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये जाणार का?, अशी एकच चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे. अशात काल सोमवारी पुण्यातील अजित पवारांचे नियोजित कार्यक्रम रद्द झाल्याने या संशयाला पुन्हा बळकटी मिळाली. मात्र, आता अजित पवार यांनीच याबाबत खुलासा केला आहे.
नियोजित कार्यक्रमाचा दावा फेटाळला
अजित पवार यांनी ट्विट करत सांगितले आहे की, सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. मंगळवारी 18 एप्रिलरोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे.
सोमवारी पहाटेपर्यंत मुंबईतच
खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. त्यामुळेच मी पुण्याला गेलो नसल्याचे स्पष्टीकरणही अजित पवारांनी दिले आहे.
आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या खोट्या
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 8 एप्रिलरोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला होता. तसेच, अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 30 ते 40 आमदारही भाजपसोबत जाणार, असा दावा या वृत्तपत्राने केला होता. त्यानंतर आज अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवली आहे, अशा चर्चांनाही उत आला होता. याबाबतही अजित पवारांनी खुलासा केला आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे की, मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.
अजित पवारांच्या मनात काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 8 एप्रिलरोजी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्यानेच ही माहिती दिल्याचे यासंबंधीच्या बातमीत म्हटले आहे. त्यानंतर काल अजित पवार यांचे पुण्यातील कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे अजित पवार भाजपमध्ये जाणार का? अजित पवारांच्या मनात नेमके शिजतेय तरी काय?, या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.