महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० एप्रिल । ‘जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार,’ असे सांगत विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मंगळवारी भाजपशी हातमिळवणीच्या चर्चेला पूर्णविराम दिला तरीही राज्यातील संभाव्य राजकीय भूकंपाच्या चर्चा थांबलेल्या नाहीत. राष्ट्रवादीचे सुमारे ३८ ते ४० आमदार भाजपसोबत जाण्यास उतावीळ आहेत. मात्र शरद पवार राजी होत नाहीत. त्यामुळे भाजप शिवसेेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही मोठी फूट पाडू शकतो, अशी भीती शरद पवारांना वाटतेय. त्यामुळे त्यांनी अजितदादांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवली आहे. इतकेच नव्हे, पक्षाच्या आमदारांशी ते फोनवर चर्चा करून मन जाणून घेत आहेत. त्यांना संयम राखण्याच्या सक्त सूचनाही देत आहेत. दुसरीकडे, बुधवारी दिवसभर अजित पवारांच्या शासकीय बंगल्यावरही (देवगिरी) बैठकांचे सत्र सुरू होते.
काकांचे दूत ‘देवगिरी’वर : दादांची ‘मन की बात’ जाणून घेत दिला सबुरीचा सल्ला
*ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स चौकशीत अडकलेले राष्ट्रवादीचे नेते भाजपसोबत जाण्यास उतावीळ आहेत. मात्र शरद पवारांची परवानगी असेल तरच पाऊल उचलावे, असा त्यांचा आग्रह.
*काही आमदार मात्र अजितदादांच्या नेतृत्वात बंड करून भाजपसोबत जाण्यास तयार झाले आहेत. अशा उतावीळ नेत्यांवर भाजपचा डोळा. यातून राष्ट्रवादीत फूट पडण्याची भीती आहे. या आमदारांवरही पवारांच्या ‘विश्वासू’ टीमचे लक्ष.
*म्हणूनच शरद पवारांनी बुधवारी जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, अनिल देशमुख या ज्येष्ठ नेत्यांना ‘देवगिरी’वर पाठवून अजितदादांच्या मनात नेमके काय चाललेय याबाबत जाणून घेतले.
*सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर आपला पक्ष ‘योग्य’ तो निर्णय घेईलच, पण तोपर्यंत बंडाचे पाऊल उचलण्याची घाई करू नका… असा पवारांचा निरोपही या ‘दूतां’नी अजितदादांपर्यंत पोहोचवल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
२०१९ मध्ये फोनवरूनच मोडून काढले होते बंड
अजित पवार यांनी २०१९ मध्येही पहाटेच्या शपथविधीचे धाडस केेले होते. त्या वेळी त्यांच्यासोबत १० ते १५ आमदारच होते. हा प्रकार घडताच पवारांनी या सर्व आमदारांना फोन करून बाेलावून घेतले व बंड मोडून काढले. ‘या वेळी परस्पर निर्णय घेतल्यास राजकीय आत्महत्याच ठरेल,’ असा दट्ट्याच पवारांकडून दिला जात आहे. त्यामुळे आमदार द्विधा मन:स्थितीत आहेत.