महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० एप्रिल । एसटी महामंडळाच्या ‘शिवनेरी’ बसने मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. या मार्गावर इलेक्ट्रिक एसटी बस अर्थात ‘ई-शिवनेरी’ सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सध्याच्या तिकीट दराच्या तुलनेत याचे तिकीट दर कमी असेल. महाराष्ट्र दिनी म्हणजेच एक मेपासून ई-शिवनेरी प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन एसटी महामंडळाने केले आहे.
डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक बसचा परिचालन खर्च (ऑपरेटिंग कॉस्ट) कमी आहे. यामुळे देशभरातील राज्य परिवहन महामंडळामध्ये फेम योजनेंतर्गत या बसचा समावेश करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परिचालन खर्च कमी असल्याने त्याचा लाभ प्रवाशांना मिळावा यासाठी मुंबई-पुणे शिवनेरीचे तिकीट दर ७० ते १०० रुपयांनी कमी करण्याचे प्रस्तावित आहे, असे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या मुंबई-पुणे प्रवासाचे तिकीट ५१५ रुपये आहे. महामंडळाचा प्रीमियम ब्रँड म्हणून शिवनेरी ओळखली जाते. व्होल्व्हो श्रेणीतील आरामदायी, वातानुकूलित, वेगवान प्रवासासाठी मुंबई-पुण्यातील प्रवासी शिवनेरीला प्राधान्य देतात. हा प्रवासी कायम राहण्यासाठी ई-बसचे नामकरण ई-शिवनेरी करण्यात आले आहे. यामुळे ‘शिवनेरी’चा ग्राहक या नव्या गाडीकडेही आकृष्ट होण्याचा महामंडळाला विश्वास आहे.
ई-शिवनेरीतील सुविधा
संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी मोबाइल चार्जिंग आणि प्रकाशदिवे उपलब्ध असतील. बॅगा ठेवण्यासाठी बसच्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था असेल. बसमध्ये ४३ प्रवासी बसू शकतात. एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज केल्यावर ३०० किलोमीटरचा टप्पा पार करण्याची क्षमता या बसमध्ये आहे.
आठ गाड्या दाखल
‘ई-शिवनेरी’च्या आठ गाड्या पुण्यात दाखल झालेल्या आहेत. येत्या दोन दिवसांत या गाड्यांची नोंदणी मुंबईतील प्रादेशिक परिवहन कार्यालयात होणार आहे. त्यानंतर मुंबई-पुणे मार्गावर चाचणी करण्यात येईल. त्यानंतर ही बस सेवेत येईल.
– मुंबई-पुणे शिवनेरी तिकीट दर – ५१५ रुपये
– मुंबई-पुणे ई-शिवनेरी तिकीट दर – ४४५ रुपये ते ४१५ रुपये (अंदाजे)