महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० एप्रिल । राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. अजित पवार भाजपमध्ये जाणार इथपासून सुरु झालेली चर्चा अजूनही थांबायचे नाव घेत नाहीये. अजित पवारांनी आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात अजित पवार गैरहजर राहणार असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
उद्या घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय कार्यकर्ता शिबिर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर होणार आहे. मात्र या शिबिराच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकात कुठेही अजित पवार यांचे नाव नाही. त्यामुळे अजित पवार या शिबिराला उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या अशा कार्यक्रमात अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा रंगणार आहेत.