महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ एप्रिल । राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षावरून सातत्याने विरोधक आणि सत्ताधारी नेते विविध विधाने करत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काळ संघर्षाचा असून आता काहीही किंमत द्यावी लागली तरी मागे हटायचं नाही असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने चर्चेला उधाण आलं आहे. 
काल घाटकोपर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय शिबिर पार पडले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवारांनी असं म्हटलं आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने समन्स बजावले आहे. यासह राज्यात अन्य विरोधी नेत्यांवर देखील सीबीआय आणि ईडीची चौकशी लावलेली दिसत आहे. या सर्व प्रकरणांवरुन शरद पवारांनी (Sharad Pawar) सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले शरद पवार?
“सीबीआयची चौकशी ही आता घराघरात माहिती झाली आहे. हा देश आम्ही म्हणू तसाच चालला पाहिजे, अशा भूमिकेने या देशाचे राजकारण सुरू आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, काळ संघर्षाचा आहे जागं रहावं लागेल. काहीही किंमत द्यावी लागली तरीही मागे हटायचं नाही, असं शरद पवारांनी घाटकोपर येथील एक दिवसीय शिबिरात म्हटलं आहे.
