EPF Pension: वयाच्या ५८व्या वर्षापूर्वीच पेन्शन हवी? जाणून घ्या प्रक्रिया आणि नियम काय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ एप्रिल । ईपीएफओच्या (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) नियमांनुसार जो कर्मचारी ईपीएफओमध्ये आपले योगदान देतो आणि नोकरीची १० वर्षे पूर्ण केली असल्यास तो पेन्शनसाठी पात्र ठरतो. पण जर एकूण सेवेचा कालावधी १० वर्षांपेक्षा कमी असेल तर पेन्शनसाठी जमा केलेली रक्कम या दरम्यान कधीही काढता येते. परंतु ज्या कर्मचाऱ्यांनी १० वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा कालावधी पूर्ण केला आहे. त्यांना निवृत्तीनंतर म्हणजेच वयाच्या ५८ व्या वर्षी ईपीएफओकडून पेन्शन दिली जाते. त्यांच्या योगदानाच्या आधारे पेन्शनची रक्कम ठरवली जाते.

मात्र, जर एखाद्या व्यक्तीला ५८ वर्षापूर्वी पेन्शन हवी असेल तर EPFO कडे अर्ली पेन्शनचा पर्यायही आहे. पण अशा परिस्थितीत तुम्हाला कमी पेन्शन दिली जाते. अर्ली पेन्शन क्लेमचे नियम काय आहेत ते समजून घेऊ या.

जर तुम्ही १० वर्षे सेवा पूर्ण केली असेल आणि तुमचे वय ५० ते ५८ वर्षांच्या दरम्यान असेल, तरच तुम्ही अर्ली पेन्शनसाठी दावा करू शकता. पण यामध्ये तुम्हाला पेन्शन कमी मिळते. तुम्ही वयाच्या ५८व्या वर्षापूर्वी जितक्या लवकर पैसे काढाल, तुम्हाला दर वर्षी ४% दराने कमी पेन्शन मिळेल. समजा ईपीएफओ सदस्याने वयाच्या ५६व्या वर्षी कमी झालेली मासिक पेन्शन काढण्याचा निर्णय घेतला, तर त्याला मूळ पेन्शन रकमेच्या ९२% रक्कम मिळेल. अर्ली पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला कंपोझिट क्लेम फॉर्म भरावा लागेल तसेच १०D चा पर्याय निवडावा लागेल.

वय ५० वर्षाखालील असल्यास काय?
जर तुम्ही १० वर्षे सेवा पूर्ण केली असेल आणि तुमचे वय ५० वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही पेन्शनसाठी दावा करू शकत नाही. अशा परिस्थितीत नोकरी सोडल्यानंतर तुम्हाला फक्त ईपीएफमध्ये जमा केलेला निधी मिळेल.

१० वर्षांपेक्षा कमी कालावधीची नोकरी
जर तुमचा सेवा कालावधी १० वर्षांपेक्षा कमी असेल, तर तुम्ही पेन्शनसाठी पात्र नाही. अशा परिस्थितीत तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत. प्रथम- तुम्हाला नोकरी करायची नसेल तर तुम्ही पीएफच्या रकमेसोबत पेन्शनची रक्कमही काढू शकता. दुसरा पर्याय म्हणजे भविष्यात तुम्ही पुन्हा नोकरीत रुजू व्हाल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पेन्शन योजनेचे प्रमाणपत्र घेऊ शकता. अशा परिस्थितीत जेव्हाही तुम्ही नवीन नोकरीमध्ये रुजू व्हाल, तेव्हा या प्रमाणपत्राद्वारे तुम्हाला पूर्वीचे पेन्शन खाते नवीन नोकरीमध्ये जोडता येईल. यासह नोकरीच्या १० वर्षांच्या कालावधीतील कमतरता पुढील नोकरीत पूर्ण केली जाऊ शकते आणि वयाच्या ५८व्या वर्षी पेन्शन मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *