महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ एप्रिल । पुणे विमानतळ परिसरात उभारण्यात येत असलेल्या नव्या कार्गो टर्मिनलचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे टर्मिनल मालवाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. या नवीन कार्गो टर्मिनलमुळे पुण्यातून होणारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक दुप्पट होणार आहे. पुणे विमानतळावरून प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवासी संख्येसोबतच मालवाहतूकसुध्दा मोठ्या प्रमाणावर पुणे विमानतळावरून होत आहे. परिणामी, पुणे विमानतळावरील जुने प्रवासी आणि मालवाहतुकीचे टर्मिनल अपुरे पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर विमानतळ प्रशासनाने येथे लागूनच प्रवाशांसाठी नवीन टर्मिनल आणि मालवाहतुकीसाठी नवीन कार्गो टर्मिनल उभारण्याचे नियोजन केले. त्यानुसार आता दोन नवीन टर्मिनल आकार घेत आहेत. यात कार्गो टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात आले असून, 95 टक्के काम पूर्ण झाले आहे.