महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ एप्रिल । राज्यात चर्चा करण्यासाठी अवकाळी पाऊस, खारघर दुर्घटना, वाढती महागाई, बेरोजगारी असे अनेक मुद्दे आहेत. मात्र, या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष इतरत्र भरकटवण्यासाठीच मविआत फूट पडत आहे, अशा चर्चा घडवल्या जात आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला.
अवकाळी, महागाई, बेरोजगारीचे काय?
शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्री महाविकास आघाडीत लवकरच फूट पडेल, अशी शक्यता वर्तवत आहेत. यावर आज पत्रकारांनी अजित पवारांना विचारले असता अजित पवार म्हणाले, महत्त्वाच्या विषयावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच अशा चर्चा केल्या जात आहे. खारघर दुर्घटनेत सरकारच्या निष्काळजीपणामुळे 14 निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. त्याच्यावर सरकार चर्चा का करत नाही? अवकाळी पावसामुळे शेतकरी पुरता कोलडमडून पडला आहे. त्याला मदत कधी मिळणार?, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याशिवाय वाढती बेरोजगारी, महागाई यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. हे सर्व प्रश्न सोडून निरर्थक मुद्द्यांवर चर्चा केली जात आहे.
अजून मंत्रिमंडळ विस्तार का नाही?
पत्रकारांना उद्देशून अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या फुटीवर चर्चा करण्यापेक्षा राज्य सरकारचा अजून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, ही गंभीर बाब आहे. सध्या एकही राज्यमंत्री नाही. मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश केलेला नाही. नवे सरकार येऊन आता 9-10 महिने झाले आहेत. सुरूवातीला काही महिने तर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे दोनच मंत्री होते. आता सध्या 20 मंत्री आहेत. मात्र, 23 जण अजून वेटिंगवर आहेत.