सत्तांतरावर वेगवेगळे दावे प्रतिदावे : कोर्टाच्या निर्णयाचा मात्र कुणालाच अंदाज लागेना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ एप्रिल । राज्यातील शिंदे सरकारचे भवितव्य ठरवणाऱ्या सत्तासंघर्षाची सुनावणी १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झ‌ाली, मात्र अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते निकालाचे अंदाज लावत आहेत. सरकारला धोका नसल्याचे शिंदे सेना व भाजपचे नेते सांगत आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरून हे सरकार कोसळेल, असा दावा उद्धव सेना, काँग्रेसकडून केला जातोय. राष्ट्रवादीकडून मात्र सरकार पडणार नसल्याचे भाकीत वर्तवले जात आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे, प्रकाश आंबेडकरांचे मात्र ‘राजकीय भूकंपा’चे दावे आहेत. सर्वपक्षीय नेते ‘ज्योतिषी’ बनले असले तरी राज्याचे राजकीय भविष्य काय, याचे उत्तर कोर्टाच्या निकालातच दडले आहे.

मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा, पण सरकार टिकण्याबाबत संभ्रमच

डेथ वॉरंट निघालंय, शिंदे सरकार येत्या १५ दिवसांतच कोसळणार
उद्धव सेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत म्हणाले, ‘या सरकारचं डेथ वॉरंट निघालं आहे. त्यावर सही कुणी करायची हे ठरलं आहे. हे सरकार फेब्रुवारीत कोसळणार हे मी सांगितले होते, पण कोर्टाचा निकाल लांबला. पण १५ दिवसांत सरकार कोसळणार हे नक्की.’

आमदार अपात्र ठरल्यास नवीन सीएम, सरकारला धाेका नाहीच
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले, ‘जर शिंदेंसह १६ आमदारांच्या विरोधात कोर्टाचा निकाल गेला तर शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाईल. त्यांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री येईल. पण युतीकडे बहुमत असल्यामुळे त्यांच्या सरकारला कोणताही धोका असेल असे मला तरी वाटत नाही.’

अजित पवारही सांगतात भाजप-शिवसेनेच्या बहुमताचे गणित
अजित पवार म्हणाले, ‘सध्या भाजपकडे अपक्षांसह ११५ तर शिंदे गटाकडे त्यांचे ४० व अपक्ष १० असे ५० आमदार आहेत. एकूण १६५ चे बहुमत या सरकारकडे आहे. त्यापैकी समजा १६ अपात्र ठरले तरी १४९ कायम राहतील. बहुमतासाठी सरकारला १४५ आमदारांची गरज आहे. म्हणून या सरकारला धोका नाही.’

नवा तर्क… शिंदे अपात्र ठरल्यास भाजपचा सीएम, पण देवेंद्र नव्हे!
– सत्तासंघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष अाहे. सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेची मागणी रद्दबातल केली तर एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली सरकार कार्यकाळ पूर्ण करेल.
– कोर्टाने १६ आमदार अपात्र ठरवले तर शिंदेंचे मुख्यमंत्रिपद जाईल. पण बहुमत असल्याने सरकार तरेल. नवा मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या नेत्याला संधी दिली जाईल, असा ‘बी’ प्लॅन तयार आहे.
– अशा वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सीएमपदी संधी दिली जाणार नाही, तर सहकार क्षेत्रातील मोठे प्रस्थ व २०१९ च्या निवडणुकीपूर्वी भाजपत आलेल्या नेत्याला या पदावर बसवण्यात येईल, असा तर्क राजकीय वर्तुळातून लावला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *