उष्मालाटेचा इशारा असेल, तर भारनियमन टाळण्याच्या सूचना

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ एप्रिल । उष्णतेच्या लाटेसंबंधी पूर्वसूचना देण्यात आलेली असल्यास, विद्युत वितरण कंपनीकडून दुपारच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच भारनियमन करू नये, अशा सूचना राज्याच्या उष्मालाट कृती आराखडय़ात देण्यात आल्या आहेत.उष्णतेच्या लाटेसंदर्भात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व आयआयटी मुंबई यांच्या वतीने १३ व १४ फेब्रुवारी रोजी दोनदिवसीय राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत तज्ज्ञांनी सादर केलेले संशोधनपर अहवाल, अनुभव, कार्यपद्धती, भविष्यातील नियोजन यासंबंधी चर्चेअंती घेण्यात आलेल्या निर्णयानुसार कृती आराखडय़ाच्या माध्यमातून उष्मालाटेपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना अमलात आणाव्यात याबाबतच्या मार्गदर्शक सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

राज्य कृती आराखडय़ात उष्मालाट व्यवस्थापन कालावधी हा १ मार्च ते १५ जून असा राहील, असे जाहीर करण्यात आले आहे. झोपडपट्टी, गर्दीची ठिकाणे, कारखाने, वीटभट्टी व तत्सम काम करणारे कामगार, ग्रामीण भागातील यात्रेची ठिकाणे, धार्मिक स्थळे इत्यादींचा विचार करून त्या ठिकाणी आवश्यक वैद्यकीय सुविधा सर्व आरोग्य केंद्रावर आहेत की नाहीत, याचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.शहरी भागातील सर्व बगिचे, उद्याने दुपारच्या वेळी बंद राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. उन्हाळय़ात व्यावसायिक इमारती, गोदामे, कारखाने अशा ठिकाणी अग्निशमन यंत्रणा वेळेवर उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करण्यात यावी, असे कृती आराखडय़ात म्हटले आहे.

पाळीव प्राण्यांना वेळेवर व पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी व सावली उपलब्ध करून देण्यासंदर्भात जनजागृती कार्यक्रम स्थानिक प्रशासनामार्फत राबिवण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कृती आराखडय़ानुसार ५० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या पोलीस कर्मचारी, एसटी बसचालक व वाहक तसेच तत्सम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोयीस्कर कामाच्या वेळा ठरवून द्यायच्या आहेत.राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनावर काम करणाऱ्या मजुरांना सकाळ व संध्याकाळच्या सत्रात काम देण्यात यावे, असे नियोजन करण्यास सांगण्यात आलेआहे. ज्या मजुरांना आगीच्या भट्टीसमोर काम करावे लागते, त्यांना काही ठरावीक कालावधीनंतर विश्रांती देण्याच्या सूचना संबंधित मालकांना, व्यावसायिकांना, कारखानदारांना द्याव्यात व त्याची अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी कारखाने निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे.

कृती आराखडय़ात काय?
सर्व रेल्वे स्थानके, बस स्थानके या ठिकाणी पंखे सुरू राहतील व हवा खेळती राहील याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. उष्णतेच्या लाटेसंबंधी पूर्वसूचना देण्यात आली असल्यास दुपारच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार नाही तसेच भारनियमन केले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना विद्युत वितरण कंपनीला देण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये सकाळच्या सत्रात कार्यरत राहतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *