महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ एप्रिल । अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांची रुग्णालयात नेताना हत्या करण्यात आली. यावरुन आता सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला जाब विचारला आहे. या दोघांना वैद्यकीय चाचणीसाठी नेत असताना त्यांची हत्या करण्यात आली आहे.
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांना पोलीस वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेत होते. त्यावेळी माध्यमांशी बोलत असतानाच या दोघांना गोळ्या घालण्यात आल्या. अतिक आणि अशरफच्या खुनाचा स्वतंत्र तपास करण्याची मागणी करणारी याचिका वकील विशाल तिवारी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जाब विचारला आहे. या दोघांना रुग्णालयात नेलं जात असल्याची माहिती मारेकऱ्यांना कशी मिळाली? त्यांना कसं कळलं? आम्ही टीव्हीवरही पाहिलं. रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दारापर्यंत का नेली नाही? त्यांना पायी का नेलं?, असे प्रश्न सर्वोच्च न्यायालयाकडून उत्तर प्रदेश सरकारला विचारले आहेत.
ही सुनावणी न्यायमूर्ती रविंद्र भट आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्यापुढे सुरू होती. तर उत्तर प्रदेश सरकारची बाजू वकील मुकूल रोहतगी यांनी मांडली.