महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ एप्रिल । मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर सातत्याने अपघाताच्या बातम्या समोर येत असतात. अशात आता येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची संख्या वाढल्याने बोरघाटात वाहतुकीची कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. वाहने अतिशय संथ गतीने पुढे सरकत आहेत. (Traffic Jam)
बोरघाट वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. खंडाळा घाटात मुंबई लेनवर अधून मधून १० मिनिटांचा ब्लॉक घेवून पुण्याकडे जाणारी वाहने मुंबईलेनवरून सोडण्यात येत आहेत.
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात. अशात २७ एप्रिल रोजी येथे अपघाताची मोठी घटना घडली होती. तब्बल ७ वाहनांची एकमेकांना धडक बसली. महामार्गावरील खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला होता. ज्यामध्ये एक ट्रक, स्विफ्ट, इर्टिगा अशी सात वाहने एकमेकांवर आदळली. या अपघाताची माहिती मिळताच मदत कार्याला सुरूवात केली होती. या भीषण अपघातात ४ जण जखमी झाले. तसेच या अपघातात गाड्यांचेही मोठे नुकसान झाले होते.