महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ मे । आज महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा ६२ वा महाराष्ट्र दिन. मुंबई या द्विभाषिक राज्यातून आपापली भाषा बोलणारी स्वतंत्र राज्य असावी असा आग्रह मराठी आणि गुजराती लोकांनी धरला होता. यावरूनच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची विभागणी करण्यात आली आणि स्वतंत्र महाराष्ट्र उदयास आले पण तुम्हाला माहिती आहे का पहिला महाराष्ट्र दिन कसा साजरा करण्यात आला? तर जाणून घेऊया. (Do you know how had been celebrated first Maharashtra Din in 1960)
पहिल्या महाराष्ट्र दिनासाठी ३० एप्रिल १९६० रोजी रात्री ११.३० वाजता मुंबईच्या ‘राजभवना’च्या आवारात रामलाल यांच्या शहनाईच्या मंगल सुरांनी कार्यक्रमाला सुरवात झाली. कार्यक्रमाच्या ठिकाणी खास व्यासपीठ उभारलेलं होतं.
३० एप्रिलच्या रात्री बरोबर १२ च्या ठोक्याला कार्यक्रमाचे उदघाटक पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी एका विजेच्या बटणाची कळ दाबली आणि ती दाबताच व्यासपीठाजवळ लावलेला भगव्या रंगातील महाराष्ट्राच्या नवा नकाशाची पहिली झलक दाखवण्यात आली. याप्रसंगी यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणून त्याचे पूजन केले.
सोबतच ध्वनी योजनेची संकल्पना सुद्धा या मंगलमय दिनी राबविण्यात आली. मुंबई शहरातील शेकडो मंदिर चर्च प्रार्थनास्थळांमधील घंटानाद, कित्येक कापड गिरण्यांचे भोंगे, शहरातील रेलगाड्यांचा शिट्ट्यांचा एकच आवाज या सह अन्य घटकांमधून महाराष्ट्र एकजुटीची गर्जना ऐकायला मिळाली.या प्रसंगी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी घनश्याम सुंदरा हि भूपाळी गायली व नंतर पसायदान म्हटलं.
1st May 1960
Celebrations of Inception Day of Maharashtra..#महाराष्ट्रमाझा#महाराष्ट्र@६०#Maharashtra@60#हीरकमहोत्सवीमहाराष्ट्र#MaharashtraDay#महाराष्ट्रदिन pic.twitter.com/WILlkZRebg
— MAHA INFO CENTRE (@micnewdelhi) April 30, 2020
राज्यपालांचं भाषण झाल्यावर पंडित नेहरू यांनी आपलं उद्घाटनपर भाषण दिले. नेहरू म्हणाले, “महाराष्ट्राची उन्नती ही देशाची उन्नती आहे, अशी मनोभूमिका ठेवली पाहिजे. जनतेने संयुक्त महाराष्ट्राची मागणी केली होती, ती आज पूर्ण झाली आहे.”
१ मे १९६० रोजी दुपारी १२.३० वाजता मुंबईच्या नव्या सचिवालया समोर उत्तम मेजवानी आखण्यात आली. इथेच यशवंतराव चव्हाण व इतर मंत्रीगणानी स्वतंत्र महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी म्हणून शपथ घेतली. त्यांनतर दुपारी तीनच्या सुमारास मुंबईच्या राणी बागेपासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात प्रामुख्याने बैलगाड्या लेझीम पथक तसेच ट्रक चाही समावेश होता.