महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ मे । कडक उन्हामुळे रविवारी सिंहगड, राजगड किल्ल्यांवर पर्यटकांची संख्या रोडावली होती. मात्र, खडकवासला धरण चौपाटीसह पानशेत धरण परिसर पर्यटकांनी गजबजून गेला होता. धरण चौपाटीवरील मुख्य पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले होते. हवेली पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते, सहायक पोलिस फौजदार एस. बी. भोसले, अजय पाटसकर, संतोष भापकर, प्रवीण ताकवणे रात्री आठपर्यंत धावपळ करत होते.
खडकवासला धरण चौकात वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले. खडकवासला ते डीआयएटीपर्यत मंदगतीने वाहतूक सुरू होती. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुण्याकडे जाणार्या पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. सिंहगड किल्ल्यावर मात्र पर्यटकांची संख्या रोडावली होती. दिवसभरात गडावर 440 चारचाकी व 690 दुचाकी वाहने आल्याची नोंद झाली.