ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा वट पौर्णिमा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही हिंदू धर्मात वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी वटपौर्णिमा व्रत करतात. विवाहित स्त्रिया या व्रतादरम्यान आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, त्याचबरोबर त्याला दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. पण या सणावर देखील यंदा इतर सणांप्रमाणे कोरोनाचे सावट असल्यामुळे स्त्रियांनी सुरक्षित राहून आणि नियमांचे पालन करुन ही परंपरा जपणे गरजेचे आहे.

वड, पिंपळ अशा वृक्षांची निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. त्यात आज पर्यावरण दिन देखील असल्यामुळे आजच्या दिवशी हा दुहेरी योग जुळून आला आहे.

त्रिरात्र व्रत हे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत करावे असे सांगितले आहे. अशक्य असेल त्यांनी तीन दिवस उपवास करावा अन्यथा फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव ही असून सत्यवान-सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत.

या व्रतासाठी नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावीत. मग सवित्राची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी या वेगळ्या आहेत.

वटवृक्षाचे सर्व पवित्र वृक्षात आयुष्य जास्त असून त्याचा विस्तारही पारंब्यांनी खूप होतो. वडाचे झाड गर्द सावली देखील देते. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे, अशी प्रार्थना करतात. स्त्रिया वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाचे पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने महत्त्व विशेष असल्याने पूजेचा त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही एक हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *