पुणे : आषाढी वारी पालखी सोहळा महिनाभर आधी; कामे गतीने करा ; जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ मे । आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयीसुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी सोहळा होत आहे, त्यामुळे सर्व विभागांनी संपूर्ण तयारी गतीने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, पुणे शहर विशेष शाखेचे पोलिस उपयुक्त ए. राजा, श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त अ‍ॅड. विकास ढगे-पाटील, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. माणिक मोरे, श्री संत सोपानदेव महाराज देवस्थान, श्री संत चांगावटेश्वर महाराज देवस्थान पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील पालखी सोहळा हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक सोहळा असून, सर्वांच्या सहभागातून शांततेत, आनंदात व सौहार्दात हा सोहळा यशस्वी करू. भाविकांची कोणतीही अडचण होणार नाही, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड मनपा, नगरपरिषदा तसेच सर्व स्थानिक यंत्रणांनी पाणीपुरवठ्याबाबत दक्ष राहावे. पालखी जूनमध्ये निघणार असल्याने उष्णतेचा घटकही लक्षात घेणे गरजेचे आहे.

पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत गतवर्षीपेक्षा वाढ करण्यात येईल. पालखीला टँकरने पाणीपुरवठा होणार्‍या सर्व स्रोतांची तपासणी करावी. आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची औषधे, दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तत्काळ काढून टाकण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *