महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मे । ‘‘ज्यांना माझे काम बघवत नाही, मी जे करतो त्या बद्दल ज्यांच्या मनामध्ये चुकीचे काहीतरी असते, आमच्यावर अतिशय प्रेम करणारी जे लोक आहेत, तेच माझ्याबाबत संभ्रमाचे वातावरण तयार करतात,’’ अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केली.
माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘‘शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला मी हजर नव्हतो, कारण शरद पवार साहेबांनीच प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील व इतर काही मान्यवरांना पत्रकार परिषदेला यावे असे सांगितले होते.
पत्रकार परिषदेत खुर्च्याही मर्यादित असतात. त्या मुळे त्यांच्या सूचनेनुसारच आम्ही आमच्या कामाला गेलो होतो. त्या बाबतही विनाकारण बातम्या चालविल्या गेल्या. त्यांनी जो आदेश दिला होता त्या नुसारच ठराविक लोक पत्रकार परिषदेला हजर राहिले, बाकीचे हजर राहिले नाहीत.’’
मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचाराला गेल्याचे विचारले असता पवार म्हणाले, ‘‘ते कुठे गेले? काय करतात? याच्यावर मी लक्ष ठेवत नाही. मला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही, माझी कामे सुरु आहेत.’’ राज ठाकरे यांनी नक्कल केल्याबद्दल विचारता अजित पवार म्हणाले, ‘‘राज ठाकरे यांना ‘मिमिक्री’शिवाय दुसरं काय जमतं? ‘मिमिक्री’ करणे हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे.
त्यांना जनतेने नाकारलेले आहे. स्वतःचा पक्ष वाढविण्याऐवजी अजित पवार यांची नक्कल करणे, त्यांचे व्यंग्यचित्र काढणे, यात त्यांना समाधान वाटत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.’’