सुट्ट्यामुळे सिंहगड-खडकवासलात पर्यटकांची झुंबड; घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मे । सिंहगड किल्ल्यावर तसेच खडकवासला धरण चौपाटीवर रविवारी (दि. 7) पर्यटकांची झुंबड उडाली. खडकवासला धरण चौकापासून दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हवेली पोलिस ठाणे रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सिंहगड घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उन्हात सुरक्षारक्षकांना घाटरस्त्यात धावपळ करावी लागली.

गेल्या रविवारच्या तुलनेत आज सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या अधिक होती. सकाळी सात वाजल्यापासून वर्दळ सुरू होती. त्यामुळे गडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल झाला. थेट घाटरस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वनरक्षक बाळासाहेब जिवडे, संदीप कोळी, सुरक्षारक्षक शांताराम लांघे, तानाजी खाटपे, नितीन गोळे, चव्हाण, पढेर आदी सुरक्षारक्षकांनी धावपळ केली.

खडकवासला चौपाटीसह धरण परिसर पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाला होता. पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले होते. हवेली ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निरंजन रणवरे, सहायक निरीक्षक नितीन नम यांच्यासह उपनिरीक्षक दिलीप शिंदे, सहायक पोलिस फौजदार एस. बी. भोसल आदींनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *