महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मे । पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यातील 55 किलोमीटर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. आता दुसर्या टप्प्यात नव्याने 45 किलोमीटर मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने आयुक्तांच्या मंजुरीसाठी ठेवला आहे. खडकवासला व्हाया स्वारगेट, हडपसर, खराडी आणि पौड फाटा ते वारजे, माणिकबाग तसेच वनाज ते रामवाडी मार्गांवरील वाघोली आणि चांदणी चौकापर्यंतच्या विस्तारित मार्गांचा यामध्ये समावेश आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज, कोथरूड ते रामवाडी तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर अशा एकूण 54.58 किलोमीटर मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. याशिवाय स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आता पुणे महापालिकेने शहरातील मेट्रोचे जाळे आणखी विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार पालिकेने एचसीएमटीआरसह सात मार्गांवरील 80 किलोमीटर मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) महामेट्रोला तयार करण्याचे काम दिले होते. त्यानुसार गतवर्षी महामेट्रोने या मार्गांचा डीपीआर तयार करून दिला आहे. त्यामधील एचसीएमटीआरवरील निओ मेट्रो वगळून उर्वरित जवळपास 45.7 किलोमीटर मेट्रो मार्गांच्या मंजुरीचे दोन स्वतंत्र प्रस्ताव पालिकेच्या प्रकल्प विभागामार्फत नुकतेच आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर स्थायी समिती आणि मुख्यसभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव महामेट्रोमार्फत राज्य व केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
12 हजार 431 कोटींचा खर्च
महापालिकेने प्रस्तावित केलेल्या 45 किमी मेट्रो मार्गांसाठी तब्बल 12 हजार 431 कोटींचा खर्च येणार आहे. यामध्ये वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मार्गांसाठी 3 हजार 357 कोटी, तर खडकवासला ते स्वारगेट, हडपसर ते खराडी, पौड फाटा ते वारजे, माणिकबाग या मार्गांसाठी 9 हजार 74 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. केंद्र व राज्य सरकार या निधीतून तसेच पीपीपीच्या माध्यमातून या खर्चाचे नियोजन होईल, तर महापालिकेचा आर्थिक हिस्सा हा जमिनींच्या माध्यमातून असणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा आर्थिक बोजा महापालिकेवर पडणार नाही.
या मार्गांवर होणार मेट्रो प्रकल्प
स्वारगेट ते हडपसर (8 कि.मी.)
स्वारगेट ते खडकवासला (13कि.मी)
हडपसर ते खराडी (5 कि.मी.)
एसएनडीटी ते वारजे (7 कि.मी.)
वनाज ते चांदणी चौक (1.5कि.मी.)
रामवाडी ते वाघोली (11.2 कि.मी.)