मद्य पिऊन वाहन चालवल्यास… १० हजारांचा दंड अन् परवानाही होणार रद्द

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मे । शहरात अपघात घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) वाहतूक पोलिसांसमवेत हाती घेतली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात ही कारवाई सुरू असून, वाहनचालकांचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित होऊ शकतो.

आरटीओची चार पथके आणि वाहतूक पोलिसांचे स्थानिक विभाग यांची संयुक्तपणे मद्यपी वाहनचालकांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. ही मोहीम ६ मेपासून सुरू झाली आहे. आरटीओचे पथक आणि वाहतूक पोलीस नाकाबंदी करून ही कारवाई करीत आहेत. मुंढवा, विमाननगर, कोथरूड आणि कोरेगाव पार्क या भागात ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई रात्री ९ ते १२ या वेळेत केली जात आहे. यात आतापर्यंत मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या १२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, की आरटीओची वाहतूक पोलिसांसमवेत ही कारवाई सुरू आहे. मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर खटले दाखल करून त्यांना न्यायालयात पाठवले जात आहे. न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित होऊ शकतो. मद्य पिऊन वाहन चालवल्याबद्दल पहिल्यांदा १० हजार रुपये, तर दुसऱ्यांदा १५ हजार रुपये दंड आहे. ही कारवाई ३१ मेपर्यंत सुरू राहणार आहे. या कारवाईमुळे मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर अंकुश बसेल.

मद्य पिऊन वाहन चालवल्यास…
-पहिल्यांदा सापडल्यास : १० हजार रुपये
-दुसऱ्यांदा सापडल्यास : १५ हजार रुपये
-न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास : परवाना ६ महिन्यांसाठी निलंबित

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *