महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मे । गेले आठ दिवस उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांना रविवारी दुपारनंतर झालेल्या वळिवाच्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला. सुमारे दीड तासाहून अधिक काळ हा पाऊस (Rain) कमीजास्त प्रमाणात शहर, तसेच तालुक्याच्या विविध भागांत बरसत होता.
गेल्या आठ दिवसांपासून शहरातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यातच दाटून येणाऱ्या ढगांमुळे सातारकरांच्या अंगाची लाहीलाही होत होती. गेल्या दोन दिवसांपूर्वी वेधशाळेने साताऱ्यासह विविध भागांत पावसाचा अंदाज वर्तवला होता. या अंदाजानुसार रविवारी दुपारी शहर परिसरातील आकाश काळ्या ढगांनी व्यापून गेले.
साडेतीननंतर वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने शहर परिसरात हजेरी लावली. शहरासह परिसरात आणि तालुक्याच्या विविध भागास या पावसाने झोडपून काढले. दीड तासाहून अधिक काळ हा पाऊस शहर आणि परिसरात बरसत होता. या पावसामुळे काही प्रमाणात उष्णता कमी झाली होती.
महाबळेश्वरला पावसाने पर्यटकांची उडाली तारांबळ
महाबळेश्वर : सध्या उन्हाळी हंगाम सुरू होत असल्याने येथे गर्दी वाढू लागली आहे. काल पावसाने पर्यटकांची तारांबळ उडाली. राज्यात मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली असली, तरी यावर्षी महाबळेश्वरमध्ये उन्हाळ्यातही गारवाच असल्याने येणारे पर्यटक खूष होत आहेत.
शुक्रवार, शनिवार व रविवार हे मुख्य गर्दीचे दिवस असून, सुटी असेल तर पर्यटकांची गर्दी वाढते. त्यामुळे सध्या महाबळेश्वरमध्ये उन्हाळी हंगाम जोरदार होण्याची आशा येथील व्यावसायिकांना आहे. आज सायंकाळी बाजारपेठेसह वेण्णालेक, सनसेट पाहण्याची ठिकाणे गर्दीने भरली होती. लग्नाचे मुहूर्त असल्याने लग्न मंडप सजलेली असताना अचानक पावसाचे आगमन झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला; परंतु व्यापाऱ्यांसह पर्यटक व लग्न सराईतांची तारांबळ उडाली.